श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: ।
ॐ नमो श्रीगजवदना । गणराया गौरीनंदना । विघ्नेशा भवभयहरणा । नमन माझे साष्टागी ।। १।।
नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती । ब्रम्ह्य कुमारी वीणावती । विद्यादात्री विश्वाची ।। २।।
नमन तैसे गुरुवर्या । सुखनिधान सदगुरुराया । स्मरूनी त्या पवित्र पायां । चित्तशुध्दी जाहली ।। ३।।
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन । करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभिली ।।४।।
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां । स्तोत्र महात्म्य तुमचे गावया । प्रारंभ आता करतो मी ।। ५।।
नांव गांव खुद्द स्वामींचे । किंवा त्यांच्या मातापित्यांचे । कोणालाच ठाऊक नाही साचें । अंदाज मात्र अनेक ।। ६।।
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें । तीच सत्य मानुनी प्रत्येकाने । समाधान मानावे ।। ७ ।।
म्हणे उत्तर भारती एका स्थानी । घनदाट कर्दळीच्या बनीं । स्वामी प्रगटले वारुळांतुनी । लाकुडतोड्याच्या निमित्ताने ।। ८ ।।
कुर्हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण । आगळी ती अवतार खूण । प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी ।। ९ ।।
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण । तेव्हां दिलें उत्तर छान । स्वमुखेंच समर्थानी ।। १० ।।
मी यजुवेदी ब्राम्हण । माझे नांव नृसिंहभान । काश्यप गोत्र राशी मीन । ऐसें स्वामी म्हणाले ।।११ ।।
खरें खोटें देव जाणे । बरें नाही खोलांत शिरणें । ईश्ववरी करणीची कारणें । आपण काय शोधावी ।। १२ ।।
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण । नरदेह तरीही केला धारण । सकळं भूप्रदेश केला पावन । आपुल्या चरणस्पर्शाने ।। १३ ।।
नंतर स्वामी निघाले तिथून । तीर्थयात्रेसी केले प्रयाण । दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण । प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें ।। १४ ।।
दत्तवास्तव्य जेथे निरंतर । तो थोर पर्वत गिरनार । तेथेच गेले अगोदर । नंतर फिरले इतरत्र ।। १५ ।।
यात्रेचे प्रवास संपले । तेव्हा मंगळवेढ्यासी आले । तेथे थोडे दिवस राहिले । दामाजीच्या गांवात ।। १६ ।।
काही काळ तिथे गेला । पुण्यवंतांना प्रभाव कळला । जनसमुदाय भजनीं लागला । साक्षात्कारी यतीच्या ।। १७ ।।
पुढे अक्कलकोट हें । वास्तव्याचे झाले ठिकाण । अखेरपर्यंत तिथेंच राहून । अनंत लीला दाखविल्या ।। १८ ।।
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे । आजानुबाहू कौपिन छोटे । दिगंबर असती अनेकदां ।। १९।।
स्वामी समर्थ अक्कलकोटचे । चवथे अवतार दत्तात्रयाचे । तीन अवतार यापूर्वीचे । गुरुचरित्री वर्णिले ।। २० ।।
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ । नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ । गाणगापूर दर्शन देवदुर्लभ । जागृत दत्तस्थान ते ।। २१ ।।
तेथे होउनी साक्षात्कार । पहावयासी येती चवथा अवतार । अक्कलकोट पुण्यभूमि थोर । जेथे प्रत्यक्ष दत्त वसे ।। २२ ।।
अक्कलकोटी नित्य राहूनी । अगाध गूढ लीला करूनी । भक्तांसी साक्षात्कार देऊनी । गुप्त झाले अनेकदा ।। २३ ।।
नास्तिक होते कोणी त्यांना । चमत्कार दाखविले नाना । शेवटी कराया क्षमायाचना । लागले स्वामी चरणांसी ।। २४ ।।
स्वामी सर्वसाक्षी उदार । साक्षात दत्ताचे अवतार । कधी सौम्य कधी उग्रतर । स्वरुप दाविलें दासांना ।। २५ ।।
ज्यांनी त्यांची सेवा केली । त्यांची कुळे पावन झाली । जन्मोजन्मीची पापें जळली । पुण्यराशी मिळाल्या ।। २६ ।।
सत्पुरुषाची करणी अगाध । वाणी गूढ निर्विवाद । झाल्याविण कृपाप्रसाद । अर्थ त्याचा समजेना ।। २७ ।।
स्वामींचे बोलणे थोडें । जणूं काय कठीण कोडें । अर्थ काढावे तितुके थोडे । त्यात भविष्य असे भरलेलें ।। २८ ।।
जाणणारे तेच जाणिती । घेती त्यांच्या संकेताची प्रचिती । ज्याचा तोच उमजे चित्तीं । इतरां अर्थबोध होईना ।। २९ ।।
कोणाकोणाला पादुका दिधल्या । कोणाला वाहिल्या लाखोल्या । कोणाच्या मस्तकी मारिल्या । पायांतल्या वाहाणाही ।। ३० ।।
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें । स्वामीनी दिले भरपूर देणें । कोणा पुत्र कोणा सोनेनाणे । कोणा जीवनदानही दिलें त्यांनी ।। ३१ ।।
अनेकांच्या व्याधी केल्या दूर । अनेकांना दाखविले चमत्कार । अनेकांना शिक्षा घोर । केल्या त्यांनी अनेकदा ।। ३२ ।।
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी । पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी । म्हणूनच हव्या त्या ठिकाणी । दर्शन दिधलें भक्ताना ।। ३३ ।।
न सांगता सर्व जाणिले । ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें । लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें । दु:खी कष्टी जीवांसाठी ।। ३४ ।।
दयेचा अथांग सागर । भक्तांसाठी परम उदार । अनेकांचा केला उध्दार । सदुपदेश दिक्षा देऊनी ।। ३५ ।।
स्वामीराया दत्तात्रेया । तुमच्या कृपेची असावी छाया । हीच प्रार्थना तुमच्या पायां । मागणे नाही आणखी ।। ३६ ।।
मजवरी होता कृपादृष्टी । दत्तमय भासेल सर्व सृष्टी । सुखसंपत्तीची होईल वृष्टी । सकल सिध्दी लाभती ।। ३७ ।।
ऐसी श्रध्दा माझे मनी । उपजली आहे आतां म्हणुनीं । मिठी घातली तव चरणीं । धाव पाव समर्था तूं ।। ३८ ।।
तुमची करावी कैसी सेवा । हे मज ठाऊक नाही देवा । ओळखुनी माझ्या भोळ्या भावा । वरदहस्त ठेवा मस्तकीं ।। ३९।।
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी । तुमच्यावीण माझा कैवारी । अन्य कोणी दिसेना ।। ४० ।।
तुमचे पाय माझी काशी । पंढरपूर सर्व तीर्थे तशी । आहेत तुमच्या चरणांपाशी । मग यात्रेस जाऊ कशाला ।। ४१ ।।
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी । रंगून जातां त्यांचे नामीं । ब्रम्हा विष्णू शिवधामी । सर्व भक्ती पोंचते ।। ४२ ।।
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी । त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी । आणी आपली भावना असावी । मनोभावें ऐसी कीं ।। ४३ ।।
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी । उगीच कशास भ्यावे मी । काहींच पडणार नाही कमी । समर्थांच्या दासासी ।। ४४ ।।
भाग्यवान ते जे लागले भजनी । वादविवाद केले पंडितांनी । मग एकमुखानें सर्वांनी । मान्य केली थोर योग्यता ।। ४५ ।।
वेदांताचा अर्थ लाविला । पंडितांचा ताठा जिरविला । भाविक भक्तांना दिधला । धीर अनेक संकटी ।। ४६ ।।
स्वामी तुमचे चरित्र आगळें । अतर्क्य अलौकिक जगावेगळे । त्यांत प्रेमाचे सागर सांठले । धन्य धन्य ज्यांना उमजलें ते ।। ४७ ।।
बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी । लहान मोठ्या अधिकार्यांनी । गरीबांपासून श्रीमंतांनी । सेवा केली यथाशक्ती ।। ४८ ।।
जे जे तुमच्या भजनीं लागले । त्यांचे त्यांचे कल्याण झालें । हवें हवें ते सारें मिळाले । श्री समर्थ कृपेनें ।। ४९ ।।
पुढे संपल्या लीला संपले खेळ । ताटातुटीची आली वेळ । स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ । परब्रह्म्यांत मिळालें ।। ५० ।।
शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी । चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी । पुण्य घटिका तिसर्या प्रहरी । स्वामी गेले निजधामा ।। ५१ ।।
बोलता बोलता आला अंतकाळ । प्रकृतीत झाली चलबिचल । क्षणात पापण्या झाल्या अचल । निजानंदी झाले निमग्न ।। ५२ ।।
वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर । पांचवा दिवस शनिवार । स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर । दिलें दर्शन भाऊसाहेबांसी ।। ५३ ।।
ऐसा यती दत्त दिगंबर । संपवूनी आपूला अवतार । निजधामा गेला निरंतर । भक्त झाले पोरके ।। ५४ ।।
बातमी जेव्हा सर्वत्र पसरली । जनता शोकाकुल झाली । सर्व भक्तमंडळी हळहळली । अन्नपाणीही सुचेना ।। ५५ ।।
गावोगांवीची भक्तमंडळी । अक्कलकोटी गोळा झाली । समर्थांची समाधी पाहिली । आपल्या साश्रू नयनांनी ।। ५६ ।।
चवथा अवतार संपला । तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला । अक्कलकोट पुण्यभूमीला । क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें ।। ५७ ।।
अजूनही जे येती समाधीदर्शना । त्यांच्या व्याधी आणी विवंचना । संकटे आणी दु:खे नाना । स्वामी दूर करतात ।। ५८ ।।
याचे असती असंख्य दाखले । अनेकांनी अनुभवले । म्हणूनी महाराजांची पाऊले । आपणही वंदूंया ।। ५९ ।।
नम्र होउनी त्यांचे चरणीं । कळकळने करुंया विनवणी । स्वामींना यावी करुणा म्हणूनी । प्रार्थना त्यांना करुंया ।। ६० ।।
जयजय दत्ता अवधूता । अक्कलकोट स्वामी समर्था । सदगुरु दिगंबरा भगवंता । दया करी गा मजवरी ।। ६१ ।।
अनेकांच्या संकटी आला धावून । आता माझी प्रार्थना ऐकून । समर्थराया देई दर्शन । दूर लोटु नको मला ।। ६२ ।।
व्यवहारी मी जगतो जीवन । अनेक पापें घडती हातून । तव नामाचें होते विस्मरण । क्षमा याची असावी ।। ६३ ।।
सदगुरुराया कृपा करावी । तुमची सेवा नित्य घडावी । ऐसी बुध्दी मजला द्यावी । पापे सर्व पळावी ।। ६४ ।।
सुखाचें व्हावे जीवन ऐहिक । धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख ।
गृहसौख्य आणी वाहनसुख । अंती सदगति लाभावी ।।६५ ।।
तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा । म्हणुनी याचना करतों देवा । उदार मनाने वर द्यावा । आणी तथास्तु म्हणावे ।। ६६ ।।
तुमची होतां कृपा पूर्ण । जीवन माझें होईल धन्य । म्हणुनी आलों तव पायी शरण । दत्तराया दयाघना ।। ६७ ।।
मी एक मानव सामान्य । तुमची सेवा नित्य घडावी म्हणून । या पोथीचें करितों वाचन । दान द्या तुमच्या कृपेचे ।। ६८ ।।
वेडीवाकुडी माझी सेवा । स्वीकारावी स्वामी देवा । वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा । हीच अंती विनंती ।। ६९ ।।
शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी । चैत्रमासीं शुक्लपक्षी । शुभ रामनवमी दिवशी ।। पोथी पूर्ण झाली ही ।। ७० ।।
स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत । किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत । बसुनी ही पोथी वाचावी मनांत । इच्छा सफल होईल ।। ७१ ।।
माणिकप्रभू , साई शिरडीश्वर । आणी अक्कलकोट्चे दिगंबर । एकाच तत्वाचे तीन अविष्कार । भेद त्यांत नसे मुळी ।। ७२ ।।
एकाची करितां भक्ती । तिघांनाही पावते ती । ऐसी ठेऊनी आपली वृत्ती । पोथी नित्य वाचावी ।। ७३ ।।
या पोथीचे करितां नित्य पठण । प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न । करतील सर्व मनोरथ पूर्ण । सत्य सत्य वाचा ही ।। ७४ ।।
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु ।। शुभं भवतु ।। ॐ शांति:शांति:शांति: ।।
मिलिंदमाधवकृत
।। " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ।।