सज्जनपणाची श्रीमंती

सज्जनपणाची श्रीमंती

एका कुविख्यात दरोडेखोराची ही कथा. त्याचा मुलगा जेव्हा सोळा वर्षाचा झाला, तेव्हा त्याने त्याला आपल्या व्यवसायाची गुपिते सांगण्यास सुरूवात केली. तो आता आपल्या व्यवसायाची सारी सुत्रे मुलाकडे देणार होता. मुलाला तो सांगत होता. "बेटा ! तुझ्या चोरीची सुरूवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाशील आणि पोलिसांच्या हाती सापडशील. तेव्हा मी सांगतो त्याच ठिकाणी तुझ्या आयुष्यातील पहिली चोरी कर." असे म्हणून त्याने आपल्या मुलाला एका साधूची झोपडी दाखवली. मुलगा म्हणाला, "पण तिथे चोरी करून काय मिळणार ?" दरोडेखोर म्हणाला, "अरे तिथे गेलास, तर दोन फायदे होतील. एक म्हणजे तिथे पोलिस नक्की येत नाहीत. दुसरे म्हणजे त्या साधूला लोक भरपूर भेटवस्तू देतात- सोनं, चांदी, फळं.. पण तो त्या सर्वांना वाटत राहतो. तो सारं वाटणारच आहे, तर आपण का आणू नये ? आणि मी गेली तीस वर्षे तिथं चोरी करतो. त्यानं कधीही पोलिसात तक्रार केली नाही."

हे ऐकून मुलगा म्हणाला, "म्हणजे तुम्ही तीस वर्षे चोरी करूनही त्याला कधीही, काहीही कमी पडलं नाही आणि तुम्हाला मात्र अजून चोरी करावी लागते. याचाच अर्थ सज्जनपणाने जगूनच श्रीमंती लाभते. मग हा धंदा करण्यापेक्षा मी त्या साधूकडेच जाऊन राहतो."

तात्पर्य :- कितीही संकटे आली, तरी सज्जनांचे समाधान, त्यांची श्रीमंती कधीच कमी होत नाही. ते मनानेच श्रीमंत असतात. 🙏