गायत्री मंत्र

गायत्री मंत्र ही ऋग्वेदातील एक ऋचा (ऋग्वेद ३.६२.१०) आहे. [१]. ही ऋचा मंत्राप्रामाणे उच्चारली जाते. ही ऋचा गायत्री छंदात आहे. हा मंत्र सूर्याच्या उपासनेचा मंत्र आहे. गायत्री मंत्र हा चोवीस अक्षरांचा आहे. प्रत्येक अक्षराची एक देवता अशा या चोवीस देवता मानल्या आहेत.
देवता : १) अग्नि, २) वायु, ३) सूर्य, ४) आकाश, ५) यम, ६) वरुण, ७) बृहस्पति, ८) पर्जन्य, ९) इंद्र, १०) गंधर्व, ११) पूषा, १२) मित्र, १३) त्वष्टा, १४) वसु, १५) मरुद्रण, १६) सोम, १७) अंगिरा, १८) विश्वेदेव, १९) अश्विनीकुमार, २०) प्रजापति, २१) संपूर्ण देवता, २२) रुद्र, २३) ब्रह्मा आणि २४) श्रीविष्णु

गायत्री महामंत्र : यजुर्वेदतील मंत्र 'ॐ भूर्भूवः स्वः' मूळ गायत्री मंत्रास जोडून गायत्री महामंत्र पुढील प्रमाणे होतो.

"ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्। "

मूळ गायत्री मंत्राचा अर्थ :
विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. किंवा सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे, त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत. तो आमच्या विचारांना प्रेरणा देवो.

गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सत्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्यांंना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. 'तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो' अशी प्रार्थना यामध्ये करायची असते.